नाशिक : प्रसिद्ध दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या जेलरोड परिसरातील २० वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अभिजित नवनाथ पवार असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी जेलरोड परिसरातील १० मित्र-मैत्रिणी दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अभिजित पाण्यात उतरला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला बाहेर काढून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे त्याच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पावसाळी पर्यटनस्थळी जाताना पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.