नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हाती आल्यानंतर नाशिकमध्ये त्यांचे उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले.

मुंबई नाका परिसरात झालेल्या या स्वागत सोहळ्याला महापौर हिमगौरी आडके, सभापती मच्छिंद्र सानप, माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागतानंतर गिरीश महाजन यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे झपाट्याने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकासकामांना गती देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

दरम्यान, नाशिक शहरातील रस्ते आणि खड्ड्यांच्या प्रश्नावरही विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.

पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा मिळाल्यानंतर नाशिकच्या विकासकामांसह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासमोर असलेल्या आव्हानांकडे आता महाजन यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

गिरीश महाजन यांच्या स्वागतामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.