नाशिक महानगरपालिकेची महासभा आज दुपारी २ वाजता महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या महासभेत विविध समित्यांवरील सदस्य नियुक्त्यांसह शहरातील विकासकामे आणि महापालिकेच्या मालमत्तांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.
महिला व बालकल्याण समितीसह शहर सुधारणा, आरोग्य, विधी आणि शिक्षण समितीवर प्रत्येकी ९ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
त्यामुळे या पाच समित्यांवरील नियुक्त्यांकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अंगणवाड्यांसाठी ‘जादुई पिटारा’ उपलब्ध करून देण्यासाठी ८५ लाख ७८ हजार रुपयांचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील मनपा निवासस्थानाला ७२ लाख ६२ हजार रुपयांची संरक्षक भिंत बांधण्याचा विषय चर्चेत येणार आहे.
या प्रस्तावाच्या प्राकलनाला मंजुरी देण्याचा विषयही महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.
यासोबतच महापालिका मालमत्तांशी संबंधित विविध प्रस्तावांवरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
आजच्या महासभेत कोणते प्रस्ताव मंजूर होतात आणि समित्यांवरील नियुक्त्यांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.