स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर आमदार नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘बेडकी कितीही फुगली तरी बैल होता येत नाही’, असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधला. २०२९च्या निवडणुकीत याची जाणीव होईल, असा दावाही त्यांनी केला.
पुण्यात राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. लोकशाहीमध्ये मतभेद स्वाभाविक असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, लोकसभेतील गोंधळावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरूनही गोऱ्हे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधकांना केवळ टीका करण्याशिवाय दुसरं काम उरलं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर ‘बेडकी कितीही फुगली तरी बैल होता येत नाही’, असा बोचरा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील व्यवस्थेबाबतही नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमातील व्यवस्थेबाबतचा मुद्दा विधिमंडळात मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भोंदूबाबांच्या प्रकरणावर गोऱ्हे यांनी निषेध व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अधिक सक्रिय करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. अंधश्रद्धेविरोधात ठाम भूमिका घेत सामाजिक जनजागृतीवर भर देण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. २०२९च्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.


