येवला शहरातील मिल्लत नगर परिसरात भटक्या कुत्र्याने चार ते पाच चिमुकल्यांवर अचानक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत जखमी झालेल्या मुलांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारासाठी रुग्णालयात पोहोचल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. कुत्र्याच्या चाव्यानंतर आवश्यक असलेले रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे उपचारात विलंब होऊ नये म्हणून संबंधितांना बाहेरून इंजेक्शन खरेदी करावे लागल्याची माहिती देण्यात आली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
यासोबतच शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे आणि रेबिज प्रतिबंधक इंजेक्शनचा पुरेसा साठा कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावा, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


