धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. घाटातील कोळवाडी परिसरात एकाच दिवशी चार अपघात घडले. या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
सकाळी पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यानंतर दिवसभरात याच परिसरात आणखी तीन अपघात घडले.
मांजरसुंबा घाटातील हा परिसर अपघातप्रवण ठिकाण म्हणजेच ब्लॅक स्पॉट बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्रशासन आणि कंत्राटदारांकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पवनचक्की साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या बेशिस्तपणामुळेही अपघात होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.


