महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मदतीच्या उपाययोजनांवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती दत्ता भरणे यांनी दिली. दुष्काळामुळे शेती आणि शेतकऱ्यांवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतीची प्रक्रिया वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहनही केलं. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं त्यांनी म्हटलं. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि आधार देण्यासाठी सरकार काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्य सरकारच्या उपाययोजना आणि केंद्राच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना कोणता दिलासा मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


