मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने वेतनासाठी ३९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आजपासून वेतन वितरणाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतनासाठी ५६० कोटी रुपयांची गरज असल्याने निधी अपुरा असल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी युनियनचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. मंजूर निधीतून निव्वळ वेतन दिले जाऊ शकते; मात्र पीएफ, ग्रॅच्युइटी आणि इतर वैधानिक देणी देण्याबाबत प्रश्न कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, थकीत रक्कम देण्याबाबतही शासनाकडून हालचाली सुरू असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


