नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील पळसा गावात सोयाबीनच्या ढिगाला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी रामराव सेकुराव मस्के यांच्या शेतातील चार एकरांवरील सोयाबीन आगीत जळून खाक झाले. २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या ढिगाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्याने बोअरवेलच्या पाण्यावर सिंचन केले होते. तसेच खते, औषधे आणि काढणीसाठी मोठा खर्च केला होता. दिवाळीपूर्वी सोयाबीनची मळणी करून त्यातून उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र, आगीच्या घटनेमुळे संपूर्ण हंगामाचे नुकसान झाले असून, कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या तलाठ्याने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मनाठा पोलीस ठाण्याचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. सोयाबीन जळाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.


