भिवंडी : विरार कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवानंद थळे यांनी प्रांताधिकारी अमित सानप यांची भेट घेतली. या बैठकीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मोबदल्यासंदर्भातील मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी देवानंद थळे यांनी प्रशासनाकडे मागणी मांडली.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीसोबत स्वतंत्र बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत मोबदल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून, त्यातून काय निर्णय होतो, याकडे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


