इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथे विविध मूलभूत प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाकडून देण्यात आलेले आश्वासन पाळले गेले नसल्याचा आरोप करत एल्गार कष्टकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनानंतर 19 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र ठरलेल्या दिवशी बैठक न झाल्याने संघटनेने प्रशासनावर आश्वासनभंगाचा आरोप केला आहे.

खैरेवाडी रस्त्याची दुरवस्था, आदिवासी वाड्यांवरील शाळा आणि अंगणवाडींची खराब अवस्था, वनहक्क दावे, घरकुल अनुदान तसेच आदिवासी जातीचे दाखले अशा विविध प्रश्नांवर संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या मागण्यांवर तातडीने बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

आश्वासनांची पूर्तता न झाल्यास 24 ऑगस्टला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेने दिला आहे. प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रश्नांवर प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.