हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर त्र्यंबकेश्वर–घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून सुरुवातीला वाद झाला. त्यानंतर आरोपींनी पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करत चालक आणि प्रवाशांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेदरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आल्याने वाहनाचे नुकसान झाले. दगडफेकीत गाडीच्या काचा, साईड मिरर आणि बंपरचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

या प्रकरणी घोटी पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

हरिहर किल्ला आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांवर झालेल्या या हल्ल्यामुळे त्र्यंबकेश्वर–घोटी मार्गावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत.