सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्यासाठी विविध उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष वाहतूक आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्यानुसार नाशिक, त्र्यंबकेश्वर, अहिल्यानगर-शिर्डी, शनी शिंगणापूर, भीमाशंकर, टाकेद, सप्तशृंगी, घृष्णेश्वर आणि कवनई या नऊ प्रमुख धार्मिक स्थळांना विशेष बसफेऱ्यांद्वारे परस्पर जोडण्यात येणार आहे.

याशिवाय रेल्वे आणि विमानांच्या वेळापत्रकानुसार बससेवेचे नियोजन करण्यात येणार असून, प्रवाशांना कमी वेळात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शटल बसमध्ये भाविकांना सिंहस्थ कुंभमेळा आणि धार्मिक स्थळांची माहिती देणारे विशेष माहितीपट दाखविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

कुंभमेळ्यादरम्यान वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध नियोजनात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.