नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत अधिकाऱ्याचे नाव राधाकिसन वारघडे असल्याची माहिती आहे. या प्रकरणात संशयित महिलेसह तिच्या दोघा मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी वारघडे यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपींनी ११२ क्रमांकावर फोन केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तसेच कारवाईपासून वाचण्यासाठी छेडछाडीचा बनाव रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाडीवन्हे पोलिसांकडून हत्येचा पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासला जात आहे.