नाशिक महापालिकेच्या जाहिरात परवानग्यांवरून वाद; १८ ठिकाणी होर्डिंग्जला नव्याने परवानगी

नाशिक महापालिकेने शहरातील १८ ठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यासाठी नव्याने परवानगी दिल्याने जाहिरात क्षेत्रात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनने आक्षेप घेत परवानग्या तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनने महापालिकेच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे याबाबत निवेदन देत निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली. संबंधित मक्तेदाराला यापूर्वीच ४५ जागांवर जाहिरात होर्डिंग्जसाठी परवानगी देण्यात आल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.

या परवानग्यांमधून सहा महिन्यांत सुमारे २५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे.

जुन्या निविदेतील अनियमिततेच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नव्या परवानग्यांचा निर्णय चर्चेत आला आहे. नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली कामे तातडीने थांबवावीत आणि नव्याने दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, अशी मागणी ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनने केली आहे.