नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात डेंग्यूसदृश आजाराने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महापालिकेच्या डास नियंत्रण उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नरहरीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच परिसरात नियमित धूरफवारणी होत नसल्याची तक्रारही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या २१ दिवसांत नाशिक शहरात ५० रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यातही ४५ डेंग्यूबाधित रुग्णांची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजारांचा वाढता धोका लक्षात घेता महापालिका प्रशासनाने डास नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

चिमुकलीच्या उपचारात दिरंगाई झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी होणे बाकी आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.