नाशिक शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरात सुमारे ४,७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार आहेत.

मिरवणूक मार्गावर १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी एआय ड्रोनच्या माध्यमातून देखरेख केली जाणार असून, संशयास्पद हालचालींवर पोलिसांची विशेष नजर असेल.

सुरक्षेच्या दृष्टीने दहशतवाद विरोधी पथकाची १४ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय आरएएफ आणि एसआरपीएफच्या कंपन्याही बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्यांनाही तैनात करण्यात येणार आहे.

दरम्यान, संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी ४०२ सराईत गुन्हेगारांना १५ दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या आवाजावरही पोलिसांची कडक नजर राहणार आहे.

विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.