CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) प्रमाणपत्राला विरोध दर्शवत नाशिकमध्ये निवासी डॉक्टरांनी शांततापूर्ण आंदोलन केले. या निर्णयाचा रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत शासनाने याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, अल्पकालीन अभ्यासक्रमाच्या आधारे आधुनिक वैद्यकीय उपचारांची परवानगी दिल्यास चुकीचे निदान, औषधांचा अयोग्य वापर आणि गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आरोग्यसेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना घाईने निर्णय घेणे टाळावे. संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवासी डॉक्टरांनी शासनाकडे केली.

आंदोलकांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध कोणत्याही वैद्यकीय शाखा किंवा अभ्यासक्रमाविरोधात नसून रुग्ण सुरक्षा, दर्जेदार आरोग्यसेवा आणि वैद्यकीय उपचारांमधील गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले आहे.