सुरगाणा तालुक्यातील चिंचला गावात मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन चक्क नदी ओलांडून जावे लागत आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने हा प्रवास अधिक धोकादायक बनत असल्याची परिस्थिती आहे.
गोंदुणे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चिंचला गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आवश्यक रस्ता नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. झिनू सुकर पालवा यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना नातेवाईक आणि ग्रामस्थांना नदी पार करावी लागली. त्यामुळे मृत्यूनंतरही कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यानंतर स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग आणखी कठीण आणि जोखमीचा बनतो. मृतदेह खांद्यावर घेऊन नदीतून मार्ग काढताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या प्रश्नावर ठोस उपाययोजना झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही नागरिकांना अशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन पक्का रस्ता आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चिंचला गावातील ग्रामस्थांनी केली आहे.


