नाशिक : सिडको परिसरातील श्री राम रबडीवाला या आस्थापनेत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रबडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पाटीलनगर येथील राजीव गांधी मार्केटमध्ये असलेल्या मे. श्री राम रबडीवाला या रबडी तयार करून विक्री करणाऱ्या आस्थापनेची पंधरा ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या तपासणीत रबडीसाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळून आल्या. तसेच, आस्थापनेतील स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले.

या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने जनआरोग्याच्या हितासाठी संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दै आणि संकेत येलमामे यांनी तपासणी केली.

दरम्यान, ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत नाशिक विभागात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची तपासणी अधिक व्यापक करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.