नाशिकच्या अंबड परिसरातील सातपूर-अंबड लिंक रोडवरील संजीवन नगर येथे पार्किंगच्या वादातून हॉटेल व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचे दृश्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलसमोर ग्राहकांची वाहने उभी केल्याच्या कारणावरून काही व्यक्तींनी हॉटेल व्यावसायिकाशी वाद घातला. त्यानंतर काही वेळाने संबंधित संशयित पुन्हा साथीदारांसह घटनास्थळी आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, संशयितांनी हॉटेल मालक तसेच कर्मचाऱ्याला मारहाण केली. या हल्ल्यात कर्मचाऱ्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एका संशयिताने धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.