नाशिक शहरात बिष्णोई टोळीच्या नावाने आलेल्या कथित धमकीच्या कॉलमुळे खळबळ उडाली आहे. एका नामांकित व्यावसायिक कुटुंबाकडे तब्बल दोन कोटी रुपयांची Extortion Demand करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पैसे दिले नाहीत तर कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिक कुटुंबाला सलग दोन दिवस WhatsApp Calls आणि Messagesच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या. घराभोवती शूटर्सची नजर असल्याचा उल्लेखही धमकीच्या संदेशांमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संशयित शुभम लोणकरच्या नावाने धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
धमकीचे कॉल International Numbersवरून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे हे कॉल प्रत्यक्षात बिष्णोई टोळीशी संबंधित आहेत का, की कोणीतरी टोळीच्या नावाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे, याचा तपास सायबर पोलीस करत आहेत.
दरम्यान, संबंधित व्यावसायिक कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या धमकीमागे नेमका कोणाचा हात आहे आणि दोन कोटींच्या खंडणीची मागणी करणारे आरोपी कोण, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.


