देवळा   : देवळा तालुक्यातील दहिवड येथील चोरचावडी धबधब्यात बुडालेल्या मनमाडजवळील वडगाव पंगू येथील 21 वर्षीय ऋषिकेश शशिकांत संसारे याचा मृतदेह तब्बल 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडला आहे. मात्र, या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश संसारे हा मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधब्यावर गेला होता. यावेळी तो पाण्यात बुडाल्याची घटना घडली. घटनेनंतर बचाव पथकाने सलग 24 तास अथक शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह बाहेर काढला.

मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ऋषिकेशच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी साध्या शवविच्छेदनाऐवजी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.

 

https://www.aplanashik24.tv/city-news/nashik-road-thackeray-hospital-newborn-death-negligence-allegation

 

कुटुंबीयांच्या मागणीनुसार मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार असून, देवळा पोलिसांनीही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

फॉरेन्सिक अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असून, संपूर्ण परिसराचे लक्ष आता या अहवालाकडे लागले आहे.