दिंडोरी पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. गुजरातहून नाशिककडे येणाऱ्या आयशर ट्रकमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे दिंडोरी पोलिसांनी चाचडगाव टोलनाक्यावर सापळा रचला होता. संशयित आयशर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
या कारवाईत 12 लाख 35 हजार 520 रुपयांचा विमल पान मसाला, 1 लाख 14 हजार रुपयांची सुगंधित तंबाखू आणि 10 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण 23 लाख 49 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी चालक जसवंतसिंग सुभाषचंद्र याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत. प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


