नाशिक शहरात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा युनिट-१ ने भीमवाडी आणि गंजमाळ परिसरात छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्यांसह एकूण १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार शहरात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-१ ला संबंधित परिसरात अवैध देशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मनोहर चिंतामण भोय (वय ४७) याला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून देशी दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने केली. अवैध धंद्यांविरोधातील कारवाया पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


