पुणे :  पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रोबोटिक्स विषय शिकवणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ सय्यद असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी आरिफ सय्यद हा संबंधित विद्यार्थिनीला ऑनलाइन माध्यमातून रोबोटिक्सचे शिक्षण देत होता. लहानपणापासून असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, तसेच आणखी कोणी पीडित आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.