नाशिकच्या सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला दगडफेकीचे गालबोट लागले. ध्वजारोहणानंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच बाहेरून शाळेच्या शेडवर अचानक दगडफेक करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
दगडफेक नेमकी कोणी केली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संस्था आणि पालकांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शाळा परिसरात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


