आडगाव नाका ते ओझर महामार्गावर मुसळधार पाऊस आणि सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळपासूनच या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रस्त्यांवर साचलेले पाणी आणि खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत. कामावर जाणारे नागरिक, शालेय वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहनेही या कोंडीत अडकली आहेत.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.