चांदवड बसस्थानक परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. २७ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या ७६ वर्षीय चंद्रभागा वरकटे या विहिरीत आढळून आल्या. नागरिक आणि आपत्कालीन पथकाच्या तत्परतेमुळे त्यांची विहिरीतून सुखरूप सुटका करण्यात आली.
चंद्रभागा वरकटे या काही तास विहिरीत अडकून राहिल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. दोर आणि इतर आवश्यक साहित्याच्या मदतीने आजींना विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी त्यांना पिंपळगाव येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, याच विहिरीत यापूर्वीही चार ते पाच दुर्घटना झाल्याचा स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विहिरीभोवती संरक्षणात्मक जाळी आणि मजबूत कठडे उभारण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
नागरिक आणि आपत्कालीन पथकाच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे ७६ वर्षीय आजीचा जीव वाचला. त्यामुळे या बचावकार्यात सहभागी झालेल्यांचे स्थानिकांकडून कौतुक केले जात आहे.


