स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर चांदवड शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चांदवडमधील रंगमहाल परिसरातून दुपारी चार वाजता तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. हातात राष्ट्रध्वज घेऊन नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन केले. नगरपरिषद कार्यालय, श्रीराम रोड, शिवाजी चौक आणि सोमवार पेठ मार्गे ही रॅली गणोर चौफुली येथील शासकीय विश्रामगृहापर्यंत काढण्यात आली.

यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण चांदवड शहर दुमदुमून गेले. रॅलीमध्ये आजी-माजी आमदारांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शासकीय विश्रामगृह परिसरात राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली. नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे चांदवडमधील हा देशभक्तीपर उपक्रम विशेष ठरला. स्वातंत्र्यदिनाआधी शहरात उत्साहाचे आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे.