नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूर मध्यमेश्वरसह विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत ५ हजार २९५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातूनही २५ हजार ९२५ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्याने रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीपात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.