नाशिकमधील गंगापूर धरण आणि बॅकवॉटर परिसरात पावसाळ्यात वाढणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन नाशिक तालुका पोलिसांनी विशेष सुरक्षा पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने धरण परिसराची पाहणी करत सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
पावसाळ्यात गंगापूर धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.
यावेळी पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, पाण्याच्या अगदी जवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले. विशेषतः बॅकवॉटर परिसरात सेल्फी किंवा साहसी प्रकार टाळण्याचेही आवाहन करण्यात आले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरण परिसरात पोलिसांकडून नियमित गस्त आणि सुरक्षा उपाययोजना सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


