चांदवड-वरबाडे रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी होऊन ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भूषण नंदकुमार कापसे असे मृत तरुणाचे नाव असून, ते देवळा तालुक्यातील वखारी गावचे रहिवासी होते.
भूषण कापसे हे चांदवड बाजार समितीत कांदे विकून ट्रॅक्टरने आपल्या गावाकडे परतत होते. वरबाडे शिवारात अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने ते ट्रॅक्टरखाली दबले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर भूषण कापसे यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे वखारी गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


