नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या मेन रोड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका खासगी घराचे पत्रे उडून रस्त्यावर पडल्याने तीन भाविक जखमी झाल्याची घटना घडली. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या जोरामुळे घरावरील पत्रे उडून रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर पडली. त्यावेळी तेथून जात असलेल्या आठ भाविकांपैकी तीन जण जखमी झाले.

जखमींना तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या एका भाविकाला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे.