राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाअभावी उभी पिकं जळू लागल्याने शेती उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

लवकरात लवकर पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दत्तात्रय भरणे यांनी श्री नंदिकेश्वराला साकडं घातलं. दगडवाडीच्या नंदिकेश्वराला अभिषेक घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा निश्चित आढावा घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. हवामान खात्याच्या अंदाजाबाबत सरकार आशावादी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या घटनांवरही भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांसमोर अडचणी असल्या, तरी आत्महत्या हा पर्याय नाही, असं त्यांनी म्हटलं. शेतकऱ्यांनी कुटुंबाचा विचार करून कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

पावसाअभावी शेतीसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना केल्या जाणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.