नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चोपड्यात महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोबाईल नेत्र चिकित्सालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते या मोबाईल नेत्र चिकित्सालयाच्या व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं.
मोबाईल आणि दूरचित्रवाणीच्या अतिवापरामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत डोळ्यांच्या विविध समस्या वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या परिसरातच नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही व्हॅन सुरू करण्यात आली आहे.
या मोबाईल नेत्र चिकित्सालयाच्या माध्यमातून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर चष्म्याचा नंबर निश्चित केला जाणार असून, गरजेनुसार नागरिकांना चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तसंच, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदत मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि परिसरातील नागरिकांना नेत्र उपचारासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या माध्यमातून ही मोबाईल नेत्र चिकित्सालयाची व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
लोकार्पण सोहळ्याला तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अंजली बर्वे, चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रसाद पाटील, डॉ. मनोज पाटील, नगराध्यक्ष नम्रता पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या नव्या सुविधेमुळे चोपडा आणि परिसरातील नागरिकांना नेत्र तपासणी व उपचारासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहे.


