चोपडा शहर आणि तालुक्यात वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दररोजची बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) संख्या ७०० पर्यंत पोहोचत असल्याची माहिती समोर आली आहे.

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विविध आरोग्यविषयक तक्रारी घेऊन नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

सर्दी, खोकला, ताप किंवा व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहन चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रसाद पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, चोपडा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.