गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात कापून ठेवलेला धान भिजला, तर कापणीसाठी तयार असलेले उभे पीकही आडवे झाले आहे. आधीच दुष्काळाचे सावट असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असताना पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.