नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कुंभमेळ्याच्या तयारीवरून आखाड्यांच्या प्रमुखांनी प्रशासनासमोर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री संजयदास महाराज यांनी पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसह विविध समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आयोजित बैठकीत संजयदास महाराज यांनी साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेतील विलंब, शाही मार्गाची दुरवस्था आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. तपोवन आणि छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या परिसरात साधू-महंतांच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच तपोवनातील सिटीलिंक बस डेपो स्थलांतरित करण्याची मागणीही त्यांनी मांडली.

 

रामकुंड परिसरातील कामांमधील त्रुटी दूर करण्याची सूचनाही संजयदास महाराज यांनी केली. रामकुंडावरील पायऱ्यांचे टप्पे कमी करावेत, भाविकांच्या सोयीसाठी रॅम्प आणि रेलिंगची व्यवस्था करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

 

गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शाही स्नानाच्या पर्वणीदरम्यान गोदावरी नदीत गटारीचे पाणी मिसळता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी प्रदूषण रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

 

दरम्यान, संजयदास महाराज सध्या साधुग्राम बचाओ समितीचे कार्यकर्ते समाधान जेजुरकर यांच्या जयशंकर लॉन्स येथे मुक्कामाला आहेत. ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नांवर प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, याकडे नाशिककरांसह साधू-महंतांचे लक्ष लागले आहे.