सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कराडजवळ झालेल्या भीषण अपघातात चार तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कातरखटाव येथील सात तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीला हा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव गावातील सात तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ गाडीतून गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना रात्री अकराच्या सुमारास कराडजवळील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या गाडीची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात तेजस देशमुख, सागर निंबाळकर, सुयश चिंचकर आणि रोहित धोत्रे या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे, शंतनू शिंगाडे आणि अमन तांबोळी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दसऱ्यानिमित्त देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चार तरुणांच्या मृत्यूच्या वृत्ताने कातरखटाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.


