नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिकमध्ये लाखो भाविक, साधू-महंत आणि पर्यटक दाखल होणार असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासह भाविकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाणार आहे. महापालिका मानधनावर १,६०० हून अधिक वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

सिंहस्थ काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने विविध ठिकाणी आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथकं आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याचं नियोजन महापालिकेकडून केलं जात आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आरोग्य व्यवस्थेवर विशेष लक्ष दिलं जात असून, अतिरिक्त वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती हा त्यातील महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.