नवी मुंबईतील तुर्भे परिसरात अवैध इंधन चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.  शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत दोन टँकरसह मोठ्या प्रमाणात डिझेल आणि पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ जप्त केला आहे.  या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपये असल्याची माहिती आहे.  या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये बेकायदेशीररीत्या डिझेल भरले जात असल्याची बाब समोर आल्यानंतर भरारी पथकाने घटनास्थळी धाड टाकली.  या कारवाईत सुमारे चौदा हजार लिटर डिझेल आणि पंचवीस हजार लिटर पेट्रोलियमसदृश द्रवपदार्थ जप्त करण्यात आला. यासोबतच दोन टँकरही ताब्यात घेण्यात आले. 

 या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.  शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे तुर्भे परिसरातील अवैध इंधन व्यवहाराचा मुद्दा समोर आला आहे.