नाशिकमध्ये २७ सप्टेंबर रोजी नियोजित असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

या अधिवेशनासाठी राज्यभरातून प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी वाटचालीवर या अधिवेशनात चर्चा होणार होती. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षवाढीसाठी नेत्यांकडून मार्गदर्शन आणि संघटनात्मक दिशा ठरवण्याचं नियोजन असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या अभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी आणि शेतीशी संबंधित प्रश्न सध्या महत्त्वाचे असल्याने राजकीय कार्यक्रमापेक्षा या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली आहे.

दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांनी अधिवेशन पुढे ढकलण्याच्या निर्णयाबाबत माहिती देताना शेतकऱ्यांना प्राधान्य असल्याचं सांगितलं. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अधिवेशनाची पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता हे राज्यस्तरीय अधिवेशन पुन्हा कधी आयोजित केलं जाणार, याकडे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.