तुळजापूर   :  तुळजापूर येथील महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थानाशी संबंधित हजारो एकर जमिनींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने देवस्थानाच्या 1,668 हेक्टर इनामी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि कथित घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

महासंघाच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी देवस्थानासाठी देण्यात आलेल्या जमिनींचे कालांतराने बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा संशय आहे. या जमिनींची मालकी, त्यावरील नोंदी आणि त्याचा लाभ नेमका कोणाला झाला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कायदेशीर सल्लागार सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले की, निजाम सरकारच्या काळात ही जमीन तुळजाभवानी देवस्थानासाठी देण्यात आली होती. त्यामुळे या जमिनीबाबत मंदिर संस्थानने जबाबदारी झटकू नये. संबंधित सर्व कागदपत्रांची फेरतपासणी करून जमीन पुन्हा देवस्थानच्या नावे करण्यात यावी, अशी महासंघाची भूमिका आहे.

 

https://www.aplanashik24.tv/maharashtra/parbhani-milk-adulteration-suspected-after-rubber-like-substance-formed

 

या प्रकरणात केवळ जमीन हस्तांतरणाचाच मुद्दा नसून, धार्मिक संस्थांच्या मालमत्तेच्या संरक्षणाचाही प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील अनेक देवस्थानांच्या जमिनींच्या नोंदी, व्यवस्थापन आणि संरक्षणाबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे तुळजाभवानी देवस्थानाच्या जमिनींच्या प्रकरणाकडे राज्यभरातील भाविक आणि विविध धार्मिक संघटनांचे लक्ष लागले आहे.

महासंघाने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, जर कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा बेकायदेशीर व्यवहार आढळून आले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांवर संबंधित प्रशासन किंवा मंदिर संस्थानाकडून अधिकृत भूमिका समोर येणे महत्त्वाचे ठरणार असून, चौकशीच्या निष्कर्षाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.