यवतमाळ जिल्ह्यात कोरड्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीनच्या घसरत्या दराचाही फटका बसत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल सात हजार एकशे ते सात हजार दोनशे रुपये दराने विकल्या जाणाऱ्या सोयाबीनचे भाव आता सहा हजार एकशे ते सहा हजार आठशे रुपयांपर्यंत घसरल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या सणासुदीत दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक चिंता वाढली आहे. व्यापाऱ्यांकडून एकमताने दर पाडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या परिस्थितीत सरकारने सोयाबीनच्या बाजारभावाच्या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर इंगळे आणि शेतकऱ्यांनी केली आहे.