अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) भेसळयुक्त दुधाविरोधातील धडक कारवाईनंतर नाशिक जिल्ह्यातील दूध संकलनात लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरात दररोज होणाऱ्या दूध संकलनात सुमारे २० हजार लिटरची घट झाल्याची माहिती मिळाली आहे. भेसळयुक्त दूध संकलन साखळीतील व्यवहार कमी झाल्याने हा परिणाम झाल्याची चर्चा आहे.

एफडीएने अलीकडील कारवाईत डिटर्जंट, स्टार्च, युरिया आणि इतर रसायनांचा वापर करून तयार करण्यात आलेले कृत्रिम दूध जप्त केले होते. या कारवाईनंतर भेसळयुक्त दूध पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई झाल्याने दूध संकलनाच्या आकडेवारीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दूध संकलनात झालेल्या घटीमागे इतर कारणेही असल्याचे सांगितले जात आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता तसेच दुधाळ जनावरांच्या संख्येत झालेली घट यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केवळ प्रमाणित आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच दूध खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.