नाशिक जिल्ह्यात बोगस आणि अपात्र शिधापत्रिका लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘मिशन सुधार अभियान’ जोरात राबवण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत तब्बल ४० हजार ३७८ अपात्र लाभार्थ्यांना रेशन व्यवस्थेतून वगळण्यात आले आहे.

शिधापत्रिकांच्या पडताळणीदरम्यान मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी, शासकीय नोकरदार, आयकरदाते तसेच चारचाकी वाहनधारक आणि मोठे पक्के घर असलेल्या अपात्र व्यक्ती रेशनचा लाभ घेत असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण २ लाख ३१ हजार ४३ अपात्र लाभार्थी रडारवर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यापैकी ४० हजार ३७८ नावे आतापर्यंत रेशन व्यवस्थेतून कायमची वगळण्यात आली आहेत.

दरम्यान, आणखी १ लाख ९० हजार अपात्र लाभार्थी प्रशासनाच्या निशाण्यावर असून, त्यांच्याबाबत पडताळणी आणि पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत स्वस्त धान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून शिधापत्रिकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. अपात्र व्यक्तींना रेशनचा लाभ मिळू नये, यासाठी विविध निकषांच्या आधारे पडताळणी करण्यात येत आहे.

मृत आणि दुबार नावे, शासकीय नोकरीतील व्यक्ती, आयकरदाते, चारचाकी वाहनधारक तसेच मोठे पक्के घर असलेल्या व्यक्तींच्या पात्रतेची तपासणी या मोहिमेत केली जात आहे.