दिंडोरी तालुक्यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तळेगाव परिसरात रस्त्यांची कामं सुरू असताना पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चक्क चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या विकासकामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य पर्यायी मार्ग किंवा वाहतुकीची व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे.

तळेगाव परिसरातील रस्त्यावर चिखल साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कुंभमेळ्याच्या कामांमुळे भविष्यात रस्त्यांची सुविधा सुधारण्याची अपेक्षा असली, तरी सध्या सुरू असलेल्या कामांदरम्यान नागरिक आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित आणि चिखलमुक्त मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज असून, संबंधित प्रशासन या समस्येकडे कधी लक्ष देणार, याकडे आता स्थानिकांचं लक्ष लागलं आहे.