नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी असून, द्वारका सर्कलवरील ५०० मिमी गुरुत्ववाहिनीच्या जोडणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
महापालिकेने द्वारका इंटरचेंजच्या कामासाठी १२ तासांचा शटडाऊन घेतला आहे.
या कालावधीत शहरातील तब्बल १७ ठिकाणी दुरुस्ती आणि गळती थांबवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामासाठी महापालिकेचे सुमारे २०० कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे.
या शटडाऊनचा परिणाम नाशिक पूर्व, सिडको, पंचवटी, सातपूर आणि नाशिकरोड यांसह शहरातील विविध भागांवर होणार आहे.
आज पाणीपुरवठा बंद राहणार असून, उद्या बुधवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.
दुरुस्ती आणि गळती रोखण्याच्या कामामुळे जलपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
नागरिकांनी घरातील उपलब्ध पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.