नाशिकमध्ये जन्माष्टमीनिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, गोदावरीच्या काठावर वसलेल्या ऐतिहासिक श्री मुरलीधर मंदिरात यंदा जन्माष्टमीनिमित्त विशेष धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल गोपाळाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, संपूर्ण परिसर कृष्णभक्तीत रंगून गेला आहे.

संत धुंडाराज महाराज यांनी सन १८२५ मध्ये स्थापन केलेल्या या मंदिराला तब्बल २०१ वर्षांची परंपरा लाभली आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

यंदाच्या उत्सवादरम्यान मंदिर परिसरात बासरीचे मधुर सूर, ढोल-वाद्यांचा निनाद आणि भक्तांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. बाल गोपाळाचे दर्शन घेण्यासाठी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भाविक मोठ्या उत्साहाने मंदिरात दाखल होत आहेत.

जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस धार्मिक सोहळ्यांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी हा उत्सव श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा अनोखा संगम ठरत आहे.

शेकडो वर्षांची परंपरा जपत साजरा होणारा हा उत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, मंदिर परिसरात सध्या उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.

📍 मुरलीधर मंदिर, नाशिक
📰 आपलं नाशिक | आपला आवाज